दाभोळे-वाटूळ मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपरमधून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष बाब यातील अनेक डंपरना नंबरप्लेटही नाहीत. ही खडी वाहतूक झाकून न ठेवता केली जात असल्याने यातील खडी रस्त्यावर पडून दुचाकीसारख्या छोट्या वाहनांचे अपघात होत आहेत; मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाटूळ-दाभोळे या मार्गावरून गेल्या काही दिवसांपासून डंपरमधून ओव्हरलोड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. अशा या डंपरमधून खडी वाहतूक करत असताना ती झाकून नेणे आवश्यक आहे. पण तसे न करता हा नियमही धाब्यावर बसवून खुलेआमपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खडी रस्त्यावर पडत आहे.
अशा खडीवरून घसरून दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ पासून गंभीर दुखापतही होऊ लागली आहे. पण याकडे सध्या कोणाचेही लक्ष नाही. वाहतुकीचे नियमांचे पालन करणाऱ्या दुचाकीस्वारांना केवळ रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अपघाताचे धोके पत्करून नाईलाजाने यामार्गावरून दररोज प्रवास करावा लागत आहे. यासंबधी तक्रार करायची तर ती कोणाकडे? त्याची संबंधित यंत्रणा दखल घेणार का? असे प्रश्नही त्यांच्या मनात आहेत. मात्र अशा जीवघेण्या ओव्हरलोड वाहतुकीकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे ना संबंधित प्रशासनाचे.
इतरवेळी सर्वसामान्य माणसाला कायदा, वाहतुकीचे नियम सांगणाऱ्या प्रशासन आणि आरटीओ (प्रादेशिक परिवहन) अधिकाऱ्यांकडून अशा डंपरवर का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे सोयीस्करपणे कारवाई करणाऱ्या यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर वेळीच कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.