मडगाव-नागपूर या रेल्वेमध्ये प्रवाशाची पर्स लंपास करून पसार झालेल्या चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागुस गोवा येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद सादिक एजाज अहमद कम निघर (वय २६) असे अटक केलेल्या तरुणांचे नाव असून त्याला आता चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ ते ९ ऑक्टोबर दरम्याने एक कुटुंब वडोदरा, गुजरात येथे जाण्याकरिता गोवा येथून मडगाव-नागपूर या एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करीत होते. हा प्रवास लांबचा असल्याने प्रवासा दरम्यान हे कुटुंब आपले सर्व किमती सामान आपल्या डोक्याजवळ घेऊन झोपून प्रवास करत होते.
चिपळूण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे थांबल्यावर या कुटुंबाला जाग आली व आपल्या साहित्य सामानाची खात्री केली असता त्यांना त्यांची शोल्डर पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये त्यांचे दोन किमती मोबाईल व इतर महत्वाची कागदपत्रे होती. याबाबत चिपळूण पोलीस ठाणे येथे फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार भा.दं.वि.सं.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. व या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या मार्फत समांतर तपास देखील सुरू करण्यात आला होता. या रेल्वे मधील चोरीच्या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला, गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला एक मोबाइल हा मोहम्मद सादीक इजाज अहमद कंमानघर, व्य २६, रा. १०१, रामनगर बेटीम रईस मागोस गोवा, मुळ रा. कम्बार स्ट्रीट, मालापूर, धारवाड, राज्य कर्नाटक, हा मडगाव गोवा येथे वापरत असल्याचे निष्पन्न झालेले होते.
पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याच्या अधिक तपास गोपनीय व तांत्रिक माहीतीच्या आधारे करून आरोपी मोहम्मद सादीक इजाज अहमद कमानघर, वय २६, रा. १०१, रामनगर बेटीम रईस मागोस गोवा, मुळ रा. कम्बार स्ट्रीट, मालापूर, धारवाड, राज्य कर्नाटक, सध्या रा. मागों म्युन्सिपल गार्डन मडगाव, राज्य-गोवा यास मडगाव, राज्य गोवा येथून दिनांक २३/११/२०२३ रोजी ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपीत याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल (मोबाईल) व अन्य चोरीचे २ म ोबाईल असा एकण रु. ३२,०००/- किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपीस पुढील चौकशी करिता चिपळूण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश खोंडे, स्थानिक गुन्हे शाखा, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. दिपराज पाटील व चालक पो.कॉ. अतुल कांबळे यांनी केली.