शहरातील पाणीटंचाई अधिक गडद होत चालली दिवसाआड पाणीपुरवठा आहे. दिवसाआड केल्यापासून एप्रिलमध्ये दरदिवशी टंचाईग्रस्त भागात पाच ते सहा टँकर लागत होते. मात्र, मेपासून पाण्याची मागणी वाढली आहे. आता दिवसाला १० ते १५ टँकरच्या फेऱ्या होत असून, आतापर्यंत ३९१ फेऱ्या झाल्या. शहराच्या वरच्या भागात सर्वाधिक टँकर लागत आहेत. म्हणजे नियमित २१ एमएलडी पाणीपुरवठ्यासह दिवसाला एक लाख पाच हजार लिटरच्यावर पालिकेला टँकरद्वारे जादा पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहराला यंदाही भीषण टंचाईचा सामना करावा लागत नसला, तरी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. शहरात सुमारे साडेदहा हजार नळजोडण्या आहेत. दरदिवशी शहराला शीळ धरणातून सुमारे २१ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यात सुधारित पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवरून शुन्यावर आले आहे; परंतु वारंवार नवीन पाइपलाईन फुटत असल्याने गळतीच्या तक्रारी काही कमी होताना दिसत नाहीत.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यानुसार रत्नागिरी पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. शीळ धरणात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे; परंतु पाऊस लांबला तर पाण्याची भीषण टंचाई भासू शकते. म्हणून १७ एप्रिलपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरात नियमित २१ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो; परंतु दिवसाआड पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात साठवणूक होते. १७ एप्रिलनंतर या भागांमध्ये दिवसाला पाच ते सहा टँकर जात होते. १ मेपासून त्यात मोठी वाढ झाली आहे. दिवसाला १० ते १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. म्हणजे दरदिवशी एक लाख पाच हजार लिटर जादा पाणीपुरवठा करावा लागतो.