अजित पवार यांनी ज्या दिवशी उडी मारली, त्या दिवसापासून शिंदे गटात वळवळ सुरू झाली आहे. त्यांचा उद्रेक थोपविताना एकनाथ शिंदेंची अवस्था दयनीय झाली आहे. ८ ते १० आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. अनेक आमदारांकडून निरोप येत आहे की, आम्ही क्षमा मागतो. परंतु, त्यांना पुन्हा घेऊ नये, असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. मातोश्रीला साद घातल्यास आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. दिशा समितीच्या बैठकीनिमित्त ते रत्नागिरी दौऱ्यावर होते.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यासाठी शब्दच सूचत नाही. अतिशय गलिच्छ राजकारण सुरू असून, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. किळसवाणे राजकारण, कुटुंब फुटीचा काळिमा, गलिच्छ आरोप होत आहेत. महाराष्ट्राकडे सर्वच तुच्छतेने पाहत आहेत. ज्या दिवशी अजित पवार यांनी शपथ घेतली त्या दिवसापासूनच शिंदे गटातील आमदार उडी मारण्याच्या तयारीत आहेत. अनेक जणांनी मातोश्रीला साद घातली आहे. त्याला प्रतिसाद देऊ. मातोश्रीची क्षमा मागावी आणि तिथं जाऊ असे काही आमदार म्हणत आहेत. मात्र, गद्दारांना परत घेऊ नये, अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे.
आठ ते दहा आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. अनेकजण विस्तारात मंत्रिपदावर डोळा ठेवून होते. काहींनी कपडे शिवले होते. त्यांना अनेकांना कळले आता आपली वर्णी लागणार नाही. शिंदे गटाला जास्तीत जास्त दोन मंत्रिपदे मिळतील. या घडामोडीमुळे काही आमदार प्रचंड नाराज आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्यात तू-तू मैं-मैं सुरू आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला जागा मिळणार नाही.’