27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriहातखंब्यात भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक

हातखंब्यात भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली. ही घटना काल सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही; मात्र तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच नाणीज धाम रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुंबईहून गोव्याच्या दिशेने ट्रकचालक नंदकिशोर रोहिदास (वय ५०, राहणार फोंडा-गोवा) ट्रक (इ. आरजे-१४, जीएच ५३२१) घेऊन जात होता. बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हातखंबा हायस्कूलजवळ अवघड वळणावर येताच गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून धडक देत समोरून येणाऱ्या एसटी (एमएच ०८ एपी ५७२३) बसला ही धडक दिली.

भरधाव ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील एसटी बसचालक रणजित मनोहर डुकरे (वय ४०, रा. रत्नागिरी) हे रत्नागिरी आगाराची बस तुळजापूरहुन रत्नागिरीच्या दिशेने आणत होते तर गॅस वाहतूक करणारा टेम्पो हा पालीच्या दिशेने जात होता. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तातडीने अपघातस्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, सहाय्यक पोलिस फौजदार घनश्याम जाधव, हवालदार जाधव, वरवडकर आदी दाखल झाले. अपघातातील तिन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

वळणावर आरसीसी भिंतीची गरज – या अवघड वळणाच्या ठिकाणी वाहनांच्या धडकेमुळे रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली आरसीसी संरक्षण भित कोसळून गायब झालेली आहे तर दुसऱ्या बाजूची संरक्षण भिंत ढासळलेली आहे. या ठिकाणी आरसीसी भिंत बांधण्याऐवजी लोखंडी रेलिंग उभारले आहे. जीवघेण्या वळणावर यापूर्वी अनेक ट्रक आरसीसी संरक्षण भिंत तोडून ३० ते ३५ फूट खोल ओढ्यात पडून अपघात झाले आहेत. लोखंडी रेलिंगवर एखादा दुचाकीस्वार जरी आदळला तरीही सहजरित्या रेलिंग मोडून थेट ओढ्यात जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या वळणावर आरसीसी संरक्षण भिंत उभारावी, अशी स्थानिकांची मागणी आहे; परंतु संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular