शासनाच्या विविध योजनांमुळे ऑनलाइन कामांचे प्रमाण वाढले आहे. विविध दाखल्यांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील १७७ महा ई-सेवा केंद्रांवर एकही व्यवहार झाला नसल्याची बाब समोर आली आहे. या केंद्रांचे परवाना (आयडी) बंद करण्याची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनाने काढली आहे. हे आयडी दोन दिवसांत सुरू करावेत अन्यथा ते बंद करण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रावर टाच येण्याची शक्यता आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सेवांचे कामकाज सुरळीत आणि लवकर व्हावे, यासाठी जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
त्यासाठी केंद्रचालकांना महाऑनलाइन आयडी देण्यात आले आहेत; मात्र गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील १७७ महा ई-सेवा केंद्रांवर एकही व्यवहार करण्यात आला नसल्याचे निदर्शनाला आले आहे. ही केंद्र बंद असल्याने नागरिकांना सेवा देताना अडचणी येत असून, कार्यरत असलेल्या महा ई-सेवा केंद्रांवर ताण येत आहे. महा ई-सेवा केंद्र नावावर असूनही ते कार्यरत नसल्याने केंद्रचालकांचे आयडी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७७ केंद्रांवर एकही व्यवहार न झाल्याने त्यांचे आयडी बंद करण्याची नोटीस दिली आहे.
योजनांमुळे वाढली गरज – लाडकी बहीण, महिला कामगार योजना यासारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी विविध प्रकारचे दाखले लागतात. हे दाखले महा ई-सेवा केंद्रातून दिले जातात; मात्र अनेक केंद्रे कार्यरतच नसल्याने जी काही केंद्रे सुरू आहेत तेथे लोकांच्या रांगा लागत आहेत. कामाला विलंब होत आहे त्यामुळे आता प्रशासनाने दखल घेतली आहे.