गेल्या काही वर्षामध्ये हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल बदल होत आहेत. वादळी वारे, अवकाळी पाऊस यासह सातत्याने होणाऱ्या तापमानवाढीचा समावेश आहे. प्रतिकूल राहणारे हवामान आंबा, काजू पिकासाठी धोकादायक ठरत आहे. हवामानातील या बदलांचा कृषिविषयक अभ्यास करण्यासाठी आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्याच्यादृष्टीने नोंदी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारी तालुक्यामध्ये विविध १९ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी गेल्या वर्षभरापासून प्रस्तावित आहेत. प्रत्यक्षात त्यांची कधी उभारणी होणार, हे अनिश्चित असताना गेल्या काही वर्षांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये कार्यरत असलेली आठ स्वयंचलित हवामान केंद्रे आपत्काल वा प्रतिकूल हवामानाचा संदेश मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या केंद्रांची संख्या काहीशी मर्यादित असल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ही हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे सर्व माहिती लागलीच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसह विमा कंपन्यांना नुकसानीची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. प्रतिकूल हवामान आणि आपत्काळाविषयी माहिती मिळण्यासही ही हवामान केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राचा प्रस्ताव वर्षभरापासून शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आठ विविध ठिकाणी कार्यरत असलेली स्वयंचलित हवामान केंद्रे उपयुक्त ठरत आहेत. प्रस्तावित हवामान केंद्रांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी केली जात आहे.