रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अथवा नोकरीनिमित्त परदेशामध्ये जातात. सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक देशांनी भारताकडून होणारी हवाई वाहतूक बंद केली आहे. तर काही देशांनी निर्बंध घातले आहेत. लसीकरण मोहीम सगळीकडे वेगाने सुरु करण्यात आली असली तरी अजून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण अद्याप पुन्हा सुरु करण्यात आलेले नाही. परदेशामध्ये जाणार्या विद्यार्थी आणि इतर नोकरदारांचे लसीकरण लवकर करण्यात यावे अशी मागणी खेड कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गौस खातीब यांनी तालुका आरोग्य अधिकार्यांकडे केली आहे.
रत्नागिरी मध्ये सध्या कोविशील्ड आणि कोवाक्सीन या दोन लसी कोरोनावर लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. त्या लसींचा दोन डोस मधील कालावधी लक्षात घेता, कोविशील्ड एक डोस घेतल्यानंतर ८४ दिवसाने दुसरा डोस आणि कोवाक्सीनचा १ डोस घेतल्यावर २८ दिवसांच्या कालावधीने दुसरा डोस अशी लसीकरण प्रक्रिया आहे. त्यामुळे ज्यांनी कोविशील्ड लस घेतली आहे त्यांना साधारण ३ महिने थांबून मग दुसरा डोस देण्यात येणार आहे.
मागील वर्षी झालेल्या कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीलाच अनेक देशांनी अनेक भारतीयांना मायदेशी धाडले, त्यामध्ये काही जणांच्या नोकर्या सुद्द्धा गेल्या. आणि तेंव्हा पासून भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन, तिसर्या लाटेचे संकेतही दिले जात आहेत. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणामुळे जे विद्यार्थी आणि परदेशात नोकरी करणारी मंडळी आहेत त्यांचे लसीकरण लवकर झाले तर त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही. त्यामुळे अशा लोकांचे प्रथम लसीकरण करण्यासाठी खेड नगरसेवक खोत तसेच ग्रामस्थ कादिरी, मुल्लाजी, तीसेकर, टाके यांच्या समवेत खतीब यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.