शहरालगतच्या खेर्डी शिवाजीनगर येथे इमारतीचे प्लास्टर करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परांदा तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये खेर्डी शिगवणवाडी येथील एकाचा समविंश असून अन्य एका मजूर महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खेर्डी शिवाजीनगर येथील एका इमारतीचे दुसऱ्या मजल्यावर प्लास्टर चे काम सुरू होते. या कामासाठी परांदा बांधण्यात आला होता.
तो अचानक तुटल्याने त्यावर चढलेले २ कामगार दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले व त्यात ते गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यामध्ये सुरेश मारुती शिगवण (३६, खेडीं शिगवणवाडी) व पूनम दिलीप सहा (४० खेर्डी शिवाजीनगर, मूळची बिहार) यांचा समावेश आहे. इमारतीचे काम करताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. तसेच इमारतीला परवानगी देताना देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याने असे निष्पाप बळी जात आहेत.
यापूर्वी देखील खेडर्डीत रंगकाम करताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. बाहेरचे कामगार आणून त्यांना कामावर लावून चक्क वाऱ्यावर सोडून देण्याची एक वेगळी ठेकेदारी चिपळूणमध्ये गेले काही वर्षांपासून सुरू झाली आहे. पण त्यामध्ये स्थानिक देखील भरडले जात असल्याचे आता स्पष्टपणे समोर येऊ लागले असून त्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दररोज असे अपघाती मृत्यू होतील आणि फक्त बघत राहण्यापलीकडे आमच्याकडे मार्ग नसेल असे खेडर्डी येथील ग्रामस्थ सांगत आहेत.