मच्छिमारी बोटींना लागणारा बर्फ घेऊन जाणारी बोट रात्री समुद्रात उलटली. या दुर्घटनेत रत्नागिरीतील एका मच्छिम ारासह दोघांचा मृत्यू ओढवला. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. तीनजणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणाऱ्या बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री वादळी वारे वाहत होते.
अशा परिस्थितीमुळे ही बोट भरकटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर ३ खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू आहे. बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (वय ६६) यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळाला. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
हेलिकॉप्टरद्वारे शोध – वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांचा शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरसह बोटही समुद्रात गस्त घालत आहे. समुद्र किनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता (वय ४९), राजा कोल (वय २९) व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत. ते किनाऱ्यावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत. २ खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. बोट दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी जेणेकरून या कुटूंबाला आधार मिळू शकेल, अशी मागणी होडी मालक चालक संघटनेकडून करण्यात आली आहे.