उन्हाळी सुट्यांमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातील संकष्टी चतुर्थीला (ता. ७) गणेशभक्तांनी गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनाला प्रचंड गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे २० हजारांहून अधिक पर्यटक येऊन गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बिफरजॉय चक्रीवादळ आणि मोठ्या भरतीमुळे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील पायऱ्यांपर्यंत पोचले होते. पर्यटकांना समुद्रात पोहण्याचा आनंद घेता आला नाही. उन्हाळी हंगामातील सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने अजूनही पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. शाळा, महाविद्यालये १२ आणि १५ जूनला सुरू होणार असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात अनेकजण फिरण्याचा आनंद घेत आहे. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरीही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरण कोरडे आहे. दिवसा उष्मा असला तरीही पर्यटकांचा उत्साह कायम आहे.
उन्हाच्या काहिलीमध्येही किनारी भागात ठिकठिकाणी गर्दी दिसते. संकष्टी चतुर्थीला मंगळवारी सायंकाळपासूनच भक्तगण गणपतीपुळेत दाखल झाले आहेत. आज पहाटेला मंदिर दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर दर्शनरांगांमध्ये उभे राहून भक्तगण दर्शन घेत होते. ऊन, पावसामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साडेपंधरा हजार भक्तांनी श्रींच्या मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडली. चंद्रोदय रात्री दहा वाजून ४४ मिनिटांनी असल्यामुळे तोपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुमारे २० हजारांहून अधिक पर्यटक येऊन -गेल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिफरजॉय चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसणार नसला तरीही दुपारी समुद्राला उधाण होते. किनारी भागात लाटांचे तांडव सुरू होते.
लाटांचे पाणी किनाऱ्यावरील कठड्यापर्यंत येऊन पोचले होते. त्यामुळे दर्शन घेऊन किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना समुद्रस्नानाचा आनंद घेता आला नाही. ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांसह पोलिस प्रशासनाकडून पर्यटकांवर वॉच ठेवण्यात आला होता. उधाणामुळे कुणीही पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन केले जात होते. किनाऱ्यावरील फेरीवाल्यांनी स्टॉल सुरक्षित ठिकाणी आणले होते. गणपतीपुळेत पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगण सर्वाधिक येतात. कोल्हापूरमधून अपेक्षेपेक्षा कमी भक्त आले.