25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriरत्नागिरीवासीय तहानलेलेच हजारो लिटर पाणी दररोज जातेय वाया

रत्नागिरीवासीय तहानलेलेच हजारो लिटर पाणी दररोज जातेय वाया

मॉन्सून अधिक लांबला आणि तीव्र पाणीटंचाईच्या झळांनी शहरवासीय कासावीस झाले आहेत. पाणीटंचाईचे मोठे संकट तोंडावर असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साळवी स्टॉप येथील टाकीला मोठी गळती लागली आहे. नागरिकांपर्यंत हे पाणी पोहोचण्यापूर्वीच ते रस्ते, नाल्यांना मिळून वाया जात आहे. एकीकडे टंचाई भागातील नागरिकांना पाणी नाही तर दुसरीकडे गळतीचे भीषण चित्र पुढे आले आहे. शहराचा पुढील २५ वर्षांच्या विस्ताराचा विचार करून शहरामध्ये सुधारित नवीन पाणीयोजना उभारून ती कार्यरत करण्यात आली. ६४ कोटींची ही अतिभव्य पालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना आहे; मात्र सुरुवातीपासून दर्जा आणि नियोजन अभावाचा फटका या योजनेला बसला.

ही योजना ६४ वरून ७४ कोटींवर गेल्याचे काही राजकीय नेत्यांचे म्हणणे. हे इतके महत्त्वाकांक्षी काम त्यासाठी निधी शासनाकडून मिळूनही कोणत्या दर्जाचे झाले हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच माहीत असे नागरिक उघडपणे बोलत आहेत. योजनेसाठी शहरातील खोदलेले चर आणि रस्ते यांच्या वेदना ऐन पावसाळ्यात चिखलमातीत नागरिकांनी सहन केल्या. आता पाण्यासाठी वणवण करत सहन करत आहेत. यातील पाईप, टाक्या जोडणी यांचा दर्जा नक्की काय होता, असा प्रश्न आज निर्माण झाला आहे.शीळ धरणात पाऊस लांबला असला तरी जून अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे; मात्र ७४ कोटी खर्चाची पाणी योजनेला जागोजाग गळती लागली आहे.

लाखो लिटर पाणी जनतेकडे पोहोचण्यापूर्वीच रस्ते आणि गटारातून वाहत आहे. एका बाजूला शहरातल्या अनेक भागात दोन दोन दिवस पाणीटंचाई, पाण्याचा टँकरही मिळत नाही. पावसाळा लांबल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक तीव्र झाली आहे. शहरातील विहिरींचे पाणी गायब होत असल्याच्या तक्रारी सुरू होत आहेत. टंचाईची दाहकता भासत असतानाही शहरात साळवी स्टॉप येथील मुख्य टाकीला मोठी गळती लागली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे; परंतु ही गळती काढण्याच्यादृष्टीने पालिकेचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू झालेले नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular