चिपळूण शहर व परिसरातील वाशिष्ठी नदी व उपनदीवरील पूरसंरक्षक कामांसाठी २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. त्याच्या मान्यतेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी या आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री पवार यांनी आमदार निकम यांना दिले आहे. गेल्या पाच वर्षांत चिपळूण शहर विकासासाठी आमदार निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पूरनियंत्रणासाठी २१ कोटींच्या नलावडा बंधाऱ्याचे काम नुकतेच सुरू झाले. तर २९० कोटींच्या संरक्षक भिंतीच्या प्रस्तावाबरोबरच पूरनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २२०० कोटींचा पूर्वप्राथमिक आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या संदर्भात आमदार निकम यांनी मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.
चिपळूण शहरामध्ये नदीकाठावर काही ठिकाणी सखल भाग असल्यामुळे पूर कालावधीमध्ये पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात घरांना धोका निर्माण होऊन वित्तहानी होत आहे. त्यामुळे शहरामध्ये पालिका हद्दीतील एकूण ११ व ग्रामपंचायत हद्दीमधील एकूण १४ ठिकाणी पूरसंरक्षक, धूपप्रतिबंधक भिंत बांधण्याचा एकत्रित २९० कोटींचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. सदर ठिकाणी पूरसंरक्षक, धूपप्रतिबंधक भिंतीचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. या कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी निकम यांनी केली आहे.
फेरसर्वेक्षणाची गरज – वाशिष्ठी व उपनदीमधील गाळ काढल्यामुळे नदीपात्राच्या पूर वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये व भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिपळूण शहर व परिसरामध्ये विकासास चालना देण्याकरिता निळ्या व लाल पूररेषेचे फेरसर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. चिपळूण शहर पूरनियंत्रणाच्यादृष्टीने सादर केलेले प्रस्ताव आणि तयार केलेला आराखडा यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मंत्री पवार यांनी आमदार निकम यांना दिले.