प्रवाशांना स्वच्छ आणि चांगल्या सोयी सुविधा बसस्थानकांवर उपबल्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील २२७ बसस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. २०२३ २४च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने एसटी महामंडळाला बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ४०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.सध्या एसटीतून सुमारे ५० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. राज्यात एसटीचे एकुण ५८० बस स्थानके आहेत. परंतु यापैकी अनेक बस स्थानकांची अवस्था दयनीय आहे.
बस स्थानकांमध्ये स्वच्छता नाही, रंग उडालेला आहे. प्रवाशांना बसण्यासाठी चांगले बाकडे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छ शौचालये नाहीत. त्यामुळे अशा बसस्थानकातून प्रवास करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे महामंडळाने बसस्थानकांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१५ ते २०२२ या कालावधीत १७९ बस स्थानकांचे आधुनिकीकरण, पुनर्बांधणी, नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले. यापैकी ४९ बस स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर उरलेल्या बसस्थानकांचे काम आजही पूर्ण झालेले नाही. २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी ४५० कोटी रुपये मंजूर केले.