जिल्ह्यातील नागरिकांना तसेच पर जिल्ह्यातून नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिलांची छेडछाड, सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट, मद्य प्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची चोवीस तास नजर राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक ठिकाणी नियोजित जल्लोष कार्यक्रम तसेच रत्नागिरी जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून असणारी ओळख लक्षात घेता अनेक ठिकाणी २०२६ या नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून नागरिक, पर्यटक मोठ्या संखेने रत्नागिरीमध्ये दाखल होत आहेत. २०२६ च्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीं रत्नागिरी पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी येणाऱ्या पर्यटकांना सूचना व उपाय योजना आखल्या आहेत. जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मद्य प्राशन करून हुल्लड बाजी, करणाऱ्यांवर विशेष लक्ष देण्यासाठी सध्या वेषातील पोलीस पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास ब्रीथ अनालायझर यंत्राद्वारे चाचणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार. ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारी २०१६ या दिवशी, जल्लोष कार्यक्रम ठिकाणांवर व्हिडीओग्राफी पथकांद्वारे २४x७ नजर ठेवण्यात येणार.
महिलांची छेडछाड होणार नाही याकडे महिला पथकां मार्फत विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील नववर्षाच्या स्वागताच्या अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलीस ठाणेद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व मदतीसाठी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. कायद्याच्या बंधनांचे तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व पवित्र स्थळांचे जसे समुद्र किनारे, गड-किल्ले व मंदिरे, यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी दक्षता घ्यावी व सभ्यतेचे वर्तन ठेवून रत्नागिरी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

