पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी आणि खेड तालुक्यातील कशेडी घाटातील रस्त्यांलगत फेकून दिलेल्या मृतदेहाचा शोध पोलिसांनी लावला असून याप्रकरणी एका पती-पत्नीसह ३ आरोपींना गजाआड केले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, अशी ही क्राईम स्टोरी असून पोलिसांनी कौशल्याने ती उघडकीला आणली आहे. मारूती कारमध्येच खून करून मृतदेह फेकून देत पसार झालेले आरोपी महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावर्ती भागात लपले होते आणि गेले काही महिने ते पोलिसांना गुंगारा देत होते. पोलादपूर पोलीसांनी ३० एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात व्यक्तीच्या प्रेताबाबत शोध घेताना एका महिलेसह ३ आरोपी गजाआड केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी पत्रकारांना दिली. यामधील दोन आरोपींचा कर्नाटक सीमावर्ती भागात गेले दोन महिने चाललेला लपाछपीचा आणि पोलीसांना गुंगारा देण्याचा खेळ खल्लास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
३० एप्रिलची घटना – अधिक वृत्त असे की, पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० एप्रिल २०२५ रोजी जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरी भागात एका अज्ञात इसमाचा साधारणतः ३ दिवस कुजलेला मृतदेह काँक्रीटच्या संरक्षक भिंतीपलीकडे आढळून आला. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली होती. या घटनेची खबर भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी पोलिसांना दिली.
ओळख पटविली – सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार आर. के. सर्णेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार, सौरव जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेनंतर पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने तपास केला. केवळ चारच दिवसांनी संशयित आरोपी म्हणून अक्षय जाधव या तरूणाला पोलादपूर पोलीसांनी तपासाअंती ताब्यात घेतले. अक्षय जाधव याच्याकडून प्राप्त माहितीनुसार मयत व्यक्तीचे नांव सुनील दादा हसे, (वय-५४, रा. अंबड, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे असल्याचे पोलिसांनी नंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
गाडीतच केला खून – पुढील तपासामध्ये या खुनामध्ये मुख्य दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला. सुनील हसे हा वॉक्सवॅगन कार ही भाडयाने देणे आणि स्वतः वाहन चालवून उपजिविका साधणे असा व्यवसाय करतो. तो चिपळुणातील सती येथे वास्तव्याला असून त्याची वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६, रा.लेन, जयसिंगपूर, ता. कोल्हापूर) हिच्यासोबत गाडीने लिफ्ट देण्याच्या निमित्ताने ओळख झाली. वंदना पुणेकर हिला सुनील दादा हसे हा श्रीमंत आणि सधन वाटल्याने तिने त्याला जाळ्यात ओढले. मात्र, त्याच्याकडे फारसे काही आढळून न आल्याने तिने अक्षय जाधवसोबत त्याला संपविण्याचा घाट घातला. यामुळे तिने तिचा नवरा मोहन पांडुरंग सोनार, (वय-५४, रा-बोरसूत, ता-संगमेश्वर, जि-रत्नागिरी) याची मदत घेतली. म ोहनच्या मदतीने वंदना पुणेकर हिने सुनील दादा हसे याच्या गाडीमध्ये मागील सीटवर बसून सुनील हसे याला दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गुंगीचे औषध पाजले आणि त्याला कराड-चिपळूणमार्गे पोलादपूरच्या दिशेने आणताना गाडीतच ओढणीने मागील सीटवरून गळा आवळून ठार मारले आणि पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील जुन्या महामार्गालगत काँक्रीटच्या संरक्षक कठडयालगत दरीमध्ये टाकले, अशी सारी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी करूण कहाणी पोलिसांनी अथक प्रयत्नांतून शोधली आणि आरोपींना पकडले. हे दोन्ही आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून पसार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमाभागात लपून राहत होते. त्यांना शिताफिने पकडण्यात रायगडच्या पोलिसांनी यश मिळविले.