तहसील कार्यालयाच्या पथकाने रात्री पेट्रोलिंग करताना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर धडक कारवाई करीत ते पकडले. यापैकी दोन डंपरवर ८३ हजार ४९० रुपयांची दंडात्मक कारवाई केली, तर तिसऱ्या डंपर मालकाने अजून दंडाची रक्कम भरलेली नाही. तिन्ही डंपर जप्त करून तहसील कार्यालयात उभे केले आहेत. गुरुवारी रात्री गस्त घालताना महसूल पथकास तालुक्यातील म्हाप्रळ ते मंडणगड मार्गावर दोन डंपर व कुंबळे-दहागाव मार्गावर एक डंपर वाळूची वाहतूक करत असताना आढळले. त्यांच्यावर पथकाने कारवाई केली. सलग तीन दिवस आलेल्या सुटीमुळे या वाहनांवरील कारवाई खोळंबली होती. सोमवारी (ता. ८) सायंकाळी उशिरापर्यंत वाहनांवरील दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू होती. एकाचवेळी तीन डंपरवर महसूलच्या धडक कारवाईने अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वाहनांवर दंडात्मक कारवाई करून पुढील कार्यवाहीसाठी दापोली प्रांत कार्यालयाकडे प्रकरण देण्यात आल्याची माहिती तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी दिली.

