मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई करीत मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरील समुद्रात अकरा वावाच्या आतमध्ये बेकायदेशीर मच्छीमारी करणारे रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलस पकडले, पकडण्यात आलेल्या ट्रॉलर्सवर बांगड़ा, पापलेट व तत्सम मासळी आढळून आली आहे. जिल्ह्याच्या अनधिकृत पर्ससीन मासेमारी तसेच समुद्रात होणारी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण या विरोधात पारंपारिक मच्छिमार सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र मत्स्य व्यवसाय विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने मच्छिमारांकडून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आठवडाभरापूर्वी अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्याचे आदेश मत्स्य विभागाला दिले होते. मात्र तरीही काल मालवण ते देवगडच्या समुद्रात अकरा वावच्या अंतरात अनधिकृतपणे पर्ससीन मासेमारी सुरु असल्याचे बाब पारंपारिक मच्छिमारांनी छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून पुढे आणत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
तर पारंपरिक मच्छिमारांचे नेते बाबी जोगी यांनी मत्स्योद्योग मंत्र्यांच्या आदेशात दम टीका करत मत्स्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारी रोखण्याचे आदेश दिल्यानंतर मत्स्य विभागाने काल सायंकाळी मालवणच्या समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारे रत्नागिरी येथील तीन पर्ससीन ट्रॉलर्स पकडले आहेत. मालवण समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंम् लबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) म ालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील असलेल्या ‘पर्ससीन नौका सफा मारवा, नौका अब्दुल लतिफ, व नौका जलसफा द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अंदाजे ७ ते ८ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या पर्ससीन नेटव्दारे मासेमारी करत असताना पकडले. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ५५ ते ६५ खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत.
नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव आज सकाळी करण्याते आला. तसेच सदर नौकांना प्रत्येकी एक लाख रु. दंड होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी अधिकारी श्री. गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मालवण यांनी मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्यान सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीं देण्यात आली.

