महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बुधवारी ५ महत्वाच्या गॅरंटी मतदारांना दिल्या आहेत. प्रत्येक महिलेला दरमहा ३ हजार रुपये, महिला आणि मुलींना एसटीतून मोफत प्रवास, शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी आणि नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, २५ लाख रुपयांपर्यंत प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य विमा व मोफत औषधे, राज्यातील बेरोजगार तरूणाला दरमहा ४ हजार रुपयांची मदत या त्या ५ गॅरेंटी आहेत. इंडिया आघाडीची म्हणजेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची सभा बुधवारी सायंकाळीं बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे झाली. या जाहीर सभेत काँग्रेस नेते राहूल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या गॅरेंटी जाहीर केल्या. महाविकास आघाडीचे सरकार येताच या पाचही गॅरेंटीची अंमलबजावणी करू असे या सर्व नेत्यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक नेत्याने एक एक गॅरेंटी जाहीर केली. यावेळी राहूल गांधींचे घणाघाती भाषण झाले.
इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आल्यावर आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटविली जाईल. तसेच जातनिहाय जनगणना केली जाईल. देशाचे संविधान कसे धोक्यात आले आहे याबाबत भाजपा आणि संघावर कडाडून टीका केली. भाजपा आणि संघाकडून संविधान कमकुवत केलं जातं आहे. छुपेपणाने हे धोरण राबवलं जातं आहे. आज देशभरात विद्यापीठांमध्ये जे कुलगुरु आहेत त्यांची यादी काढा. त्यातं तुम्हाला संघाचेच सदस्य दिसतील. भुगोल, इतिहास, विज्ञान माहीत नसेल तरीही काही फरक पडत नाही. संघाचे आहात तर तुम्हाला कुलगुरु केलं जातं असं राहुल गांधी म्हणाले. इंडिया आघाडीची पहिली प्रचारसभा मुंबईत पार पडली. त्यावेळी राहुल गांधींनी भाजपावर टीका करत महालक्ष्मी योजनेची घोषणाही निवडणुकीच्या अनुषंगाने केली आहे.
शरद पवारांचा हल्लाबोल – या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेही भाषण झाले. त्यांनी भाजपा सरकारच्या भ्रष्टाचारावर टीका करताना सिंधुदुर्गात किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळेच कोसळला असा आरोप केला. खा. शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी दुसरी गॅरेंटी जाहीर केली. ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनम्हणून दिले जातील असे जाहीर केले.
उद्धव ठाकरेंची तोफ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफही या सभेत चांगलीच धडाडली. बेरोजगार तरूणाला दरमहा ४ हजार रुपयांची मदत देणारी चौथी गॅरेंटी त्यांनी जाहीर केली. त्याचसोबत महाराष्ट्रात मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिली. १९९५ मध्ये मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ज्याप्रमाणे ५ जीवनावश्यक वस्तुंचे दर शेतकऱ्यांचे नुकसान न करता स्थिर ठेवण्यात आले होते त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.
मोफत आरोग्यविमा – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाचवी आणि शेवटची गॅरेंटी जाहीर केली. महाराष्ट्रात सर्वांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्याची गॅरेंटी महाविकास आघाडीने दिली आहे. मोफत औषधे पुरवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
प्रचाराचा शुभारंभ – या सभेने महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला असून आता जाहीर सभांच्या तोफा धडाडू लागतील. महाविकास आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामादेखील लवकरच प्रसिद्ध केला जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.