गाफील राहू नका, प्रत्येक गावात, बोडीत, घरात तुतारीचे चिन्हे पोहचवा, एकजुटीने कामाला लागा असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात मिळेल. त्यामुळे विजय आपलाच आहे. असा, विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. चिपळूणातील जिल्हापरिषद गट तसेच शहरातील मेळाव्यात ते बोलत होते. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते माजी खासदार बुधवारी चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी चिपळूण शहरातील प्रचार फेरीत सहभाग घेतला तसेच चिपळूण शहर आणि पेढे जिल्हापरिषद गट, सावर्डे जिल्हापरिषद गट, अलोरे जिल्हापरिषद गट, पोफळी जिल्हापरिषद गट नांदीवसे पंचायत समिती, कोंढे पंचायत समिती गण येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन थेट संवाद साधला आणि निवडणुकीबाबत कानमंत्र देखील दिला.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, तालुकाप्रमुख विनोद झगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा, शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेस शहराध्यक्ष विनायक सावंत, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण शहरातून हा प्रचार दौरा सुरू करण्यात आला होता.
यावेळी विनायक राऊत म्हणाले ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी ही निवडणूक आहे. विचारांची ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुमचे आमचे अस्तित्व पणाला लागलेले आहे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार हे महत्वाचे नसून महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार निवडून देऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणणे महत्वाचे आहे. त्यामुळे एक एक जागा महत्वाची आहे. प्रशांत यादव सारखा एक सज्जनशील कर्तृत्वान तरुण उमेदवार म्हणून आपल्याला लाभला आहे. त्याला विजयी करणे ही तुमची जबाबदारी आहे, असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी रमेश कदम, संचिन कदम तसेच उमेदवार प्रशांत यादव यांनी देखील मार्गदर्शन केले.