विकास कामांना निधी आणला आणि यापुढेही आणला जाईल… विकास कामे करताना आता प्रथम प्राधान्य हे बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती असणार आहे… मतदार संघात प्रदूषणमुक्त उद्योगांची उभारणी आणि मिनी एमआयडीसी उभी करणार असून मतदार संघात असणाऱ्या आद्योगिक क्षेत्राला चालना देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. मतदारसंघासाठी जाहीरनामा महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यापूर्वी ५ वर्षात मतदारसंघात केलेली कामे आणि भविष्यात करावयाची कामे या जाहीरनाम्यात असून त्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी माजी सभापती विजय गुजर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोट्यवधीचा निधी आणला – चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कोट्यावधीचा निधी आणला आणि पुढे ही आणला जाईल. २४९०,९१ कोटी एवढा निधी आपण आणला. यातून प्रत्येक गाव वाडीवस्तीवर विकासाची कामे केली आहेत असे शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी उद्योगभवन –खेर्डी, खडपोली, देवरुख येथील साडवली एमआयडीसी या ठिकाणी महिला उद्योगभवन आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. यातून महिलांना रोजगार मिळणार आहे. गावागावातील बचतगटांना काम मिळेल. त्यातून बचतगटाची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
पूरमुक्त चिपळूण करणारच – महापुरामुळे चिपळूण शहरात तसेच बाजारपेठेत मोठे नुकसान होते. त्यावर केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात धोका कमी झाला. मात्र चिपळूण पूरमुक्त करण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते ते आपण करू. पूरमुक्त चिपळूणसाठी आपला आराखडा तयार आहे. लवकरच मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून आपण यावेळी कायम स्वरूपी शहर पूरमुक्त करणारच असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
पर्यटन आणि त्यातून रोजगार – येणाऱ्या काळात आपणाला रोजगार निर्मितीवर भर द्यावयाचा आहे. यासाठी पर्यटन हा महत्वाचा भाग आहे. येथील यात्रा स्थळ, तीर्थक्षेत्र, गड किल्ले विकसित केले जाणार आहेत आणि त्यातून पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे शेखर निकम यांनी सांगितले. मार्लेश्वर, कसबा अशी अनेक धार्मिक स्थळे तसेचे गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्यादृष्टीकोनातून विकास करू असे आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात दिले आहे.
नवीन उद्योग आणणार – खेर्डी, खडपोली, साडवली या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त उद्योग आपण आणणार आहोत. त्यातून हजारो रोजगार उपलब्ध होणार आहेत. सध्या या एमआयडीसीमध्ये असलेले काही उद्योग अडचणीत आहेत. मात्र येणाऱ्या काळात त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट आणणार असल्याचे शेखर निकम यांनी सांगितले.
आरोग्यसेवा सक्षम करणार – आरोग्यसेवा दर्जेदार असली पाहिजे यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मात्र यावेळी योग्य नियोजन करून ट्रामासेटर अत्याधुनिक करून मतदारसंघात आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आहोत असे आश्वासन आमदार निकम यांनी जाहीरनाम्यात दिले आहे.
जलपर्यटनाचा विकास – मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे याकरिता लहान पाझर तलाव, धरणे, बंधारे उभारून जलसिंचनाची सोय केली जाणार आहे. तसेच नदीविकास आणि नदीजोड योजनांमधून नदी संवर्धन सुशोभीकरण आणि त्यातून जलपर्यटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात जलपर्यटन सुरू झालेले दिसेल असे शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
चिपळूण-कराड रेल्वे मार्ग – चिपळूण-कराड रेल्वे मार्ग झाला पाहिजे याचा पाठपुरावा आपण केला आहे. करतोही आहे. हा मार्ग होण्यासाठी यश नक्कीच येईल. त्याचबरोबर कुंडी, नायरी घाट यांची कामे तांत्रिक अडचणीमुळे थांबली आहेत. तीदेखील मार्गी लावू असा विश्वास या पत्रकार परिषदेत उमेदवार आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.