रत्नागिरी एसटी विभाग मेच्या सुटीच्या हंगामात मालामाल झाले आहे. रत्नागिरी पर्यटकांची वाढलेली संख्या, महिला सन्मान योजना आणि अखंड वाहतुकीमुळे मेमध्ये रत्नागिरी एसटी विभागाला ३६ कोटी ७८ लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या मेमध्ये २५ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तुलनेत यंदाचे उत्पन्न ११ कोटींनी अधिक आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यातून सावरण्यासाठी एसटी वाहतूक सुरू केली; परंतु शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला.
सुमारे पाच महिने हा बंद सुरू राहिल्याने एसटीची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली होती. कर्मचारी हजर झाल्यानंतरही बंद फेऱ्या पूर्ववत करताना महामंडळाला कसरत करावी लागली. रत्नागिरी विभागाची परिस्थितीही अन्य 1 विभागापेक्षा वेगळी नव्हती; मात्र त्याही परिस्थितीतून हळूहळू फेऱ्या पूर्ववत झाल्या आणि प्रवासीही पुन्हा एसटीकडे परतू लागले. शासनाने ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना फुकट प्रवास, सर्व महिला प्रवाशांना तिकीटदरात निम्मी सवलत जाहीर करताना महिला सन्मान योजना सुरू केली. या योजनेचा फायदा राज्य परिवहन महामंडळाला झाला. यावर्षी पर्यटकही मोठ्या संख्येने जिल्ह्यात आले होते.
शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर मुंबईकरही मोठ्या संख्येने गावी आले होते. त्याचा फायदा एसटीला झाला व भारमानात चांगली वाढ झाली. गावी आलेल्या मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाने जादा गाड्यांचे आयोजन केले होते. ऑनलाइन आरक्षण पद्धतीमुळे तर प्रवाशांना घरबसल्या आरक्षण मिळत आहे. प्रवासी भारमान वाढल्याने उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षी प्रति किलोमीटर ३९ रुपये, तर यावर्षी प्रती किलोमीटर ४८ रुपये उत्पन्न रत्नागिरी विभागाला मिळाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.