तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मत्स्य विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर ३९ ठिकाणी कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत. या भित्तिकांमध्ये माशांना पोषक खाद्य असलेली शेवाळ तयार होऊन मत्स्योत्पादनाला चालना मिळेल. या ठिकाणी मासे अंडी (ब्रिडिंग) घालण्यासाठी येतील. यामुळे नामशेष होणाऱ्या माशांच्या प्रजाती सुरक्षित होतील. याचे सकारात्मक परिणाम दोन वर्षांमध्ये दिसतील, असा मत्स्य विभागाचा दावा आहे. भारताच्या किनाऱ्यावरील मत्स्योत्पादनाचा अभ्यास केल्यानंतर ६५ ठळक मत्स्यजातींपैकी ३५ मत्स्यजातींचे मत्स्योत्पादन शून्य असल्याचे दिसून आले आहे. मत्स्य व्यवस्थापन, मासेमारी आणि मत्स्य प्रजातींच्या संरक्षणाची गरज लक्षात घेऊन मत्स्य विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी तमिळनाडू येथील सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, कोंडकारूळ, रत्नागिरी आणि साखरीनाटे या गावात जनजागृतीसाठी बैठका घेतल्या. त्यानंतर मत्स्य विभागाने भित्तिका उभारण्यास सुरवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ ठिकाणी २०० नग भित्तिका उभारल्या आहेत. या ठिकाणी शेवाळ निर्माण होऊन माशांसाठी आवश्यक राहुटी तयार होईल. भविष्यात तिथे मासे आश्रय घेण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी येतील. या भित्तिकामुळे नामशेष होणाऱ्या माशांच्या प्रजातींचे संवर्धन होणार आहे.
मच्छीमारांचा विरोध मावळला – या भित्तिकांमुळे मासेमारीला अडथळा निर्माण होणार, असा स्थानिक मच्छीमारांचा सुरवातीला समज होता. त्यामुळे काही ठिकाणी काम थांबवण्यात आले होते; परंतु त्याचा काय फायदा आहे, हे मत्स्य विभागाकडून समजावण्यात आले. या भित्तिका समुद्रात १० वावाच्या आत उभारण्यात आल्या आहेत. या परिसरात मासेमारीला बंदी असल्यामुळे हा प्रश्न उद्धवणार नाही, हे मच्छीमारांना पटवून दिल्यानंतर विरोध मावळला.
२५ गावांमध्ये कृत्रिम भित्तिका – शास्त्रोक्त अभ्यास करून मासळी एकत्रित करण्याचे साधन म्हणून कृत्रिम भित्तिका तयार केल्या आहेत. समुद्राच्या तळावरील आढळणारी वनस्पती व मासळीची उपलब्धता विकसित करण्यासाठी मदत करते तसेच मासळी समूहांना एकत्रित करते. मासळीची पैदास करून त्यांना घरासारखे सान्निध्य निर्माण करून देतात. कृत्रिम भित्तिका करण्यासाठी पाण्याची खोली, जलप्रदूषण, समुद्रकिनारा, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण, माशाच्या जातीचे संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मत्स्य विभागातर्फे यावर्षी जिल्ह्यातील २५ गावांमध्ये समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत.