मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनलेले असतानाच दिशादर्शक फलकांअभावी वाहनचालकांची फसगत होत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून भोस्ते घाटात कुठेही दिशादर्शक फलक लावण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे भोस्ते घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. वाहनचालकांच्या वेळेची बचत होत असली तरी चौपदरीकरणातील भोस्ते घाट वाहनचालकांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. घाटातील अवघड वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. वारंवार येथे किरकोळ अपघातही घडत आहेत.
भोस्ते घाटातून मार्गस्थ होताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. भोस्ते घाटात कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या भोस्ते घाटात अपघातप्रवण फलक लावण्याची तसदी अद्यापही राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतलेली नाही. दिशादर्शक फलकांअभावी बऱ्याचवेळा वाहनचालक बुचकळ्यात पडत आहेत. विशेषतः अपघातांचे “स्पॉट” असलेल्या ठिकाणी फलक लावणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. वाहन चालकांना कोणत्या ठिकाणी किती वेगाची मर्यादा ठेवायची, वळण कोणे आहे, अपघात क्षेत्र कोणते आहे हे फलका आभावी सहज समजून येत नाही. यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची डोकेदुखी कायम राहिली आहे. अपघाताचे धोकेही वाढू लागले आहेत.