‘जे गेले ते गेले… त्यांना पक्षाने सर्वकाही दिले तरीही ते गेले. त्यांचा विचार आता करण्याची गरज नाही. स्वार्थासाठी जे पक्ष सोडून गेले, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांचा विचार भाजपचा कार्यकर्ता कधीही करणार नाही, भाजपाची सर्व ताकद महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या पाठिशी आहे. हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे. महायुतीचा म्हणजेच आमचे उमेदवार उदय सामंतांचा विजय निश्चित आहे असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी येथे केले. बुधवारी महायुतीच्या महत्वाच्या बैठकीसाठी ना. रविंद्र चव्हाण रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर त्यांनी उमेदवार उदय सामंत यांच्यासह ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयाचा आत्म विश्वास व्यक्त केला.
स्वार्थापोटी गद्दारी – भाजप सोडून एक नेता गेला असला तरी भाजपचा मतदार हा अजूनही पक्षासोबत आहे. भाजपचा कार्यकर्ता असो अथवा मतदार असो तो विचारधारा मानतो. स्वार्थापोटी जे पक्षाशी गद्दारी करून गेले त्यांच्याशी या मतदाराचे काहीही देणे घेणे नाही. विचारधारा मानणारा मतदार हा भाजपाच्या आणि महायुतीच्या पाठिशी आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे ना. रविंद्र चव्हाण म्हणाले. आमचा कार्यकर्ता आमच्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते म हाविकास आघाडीने आयात केलेल्या उमेदवारासोबत आहेत अशी चर्चा आहे. त्याचा परिणाम कितपत होईल असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केलाद असता भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार हा १०० टक्के पक्षासोबत आहे. स्वार्थापोटी जे गेले त्यांच्या पाठिशी व तो कधीही उभा राहणार नाही याची मला खात्री आहे. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. नरेंद्र मोदींना मानणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार कशाला करायचा?
पक्षात कोणी नाराज नाही – भाजपच्या कार्यकर्त्यांची मानसिकता पक्षासोबत राहण्याची आहे. कोणी नाराज असेल असे मला वाटत नाही. तरीही पक्षाची विनंती सर्वांना आहे की महायुतीचा उमेदवार या मतदारसंघात विजयी झाला पाहिजे. व आमची विनंती आमचा कार्यकर्ता आणि आपला मतदार निश्चित मान्य करेल असा विश्वास ना. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
उदय सामंतांचा विजय निश्चित – महायुतीचे उमेदवार उदय सामंत आहेत. महायुतीतील प्रत्येक घटकपक्ष आणि कार्यकर्ते ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे असे रविंद्र चव्हाण म्हणाले. किती मतांनी विजयी होतील असा प्रश्न एका पत्रकारांने चाय पे चर्चा दरम्यान उपस्थित केला असता एकूण मतदानापैकी ६० ते ६२ टक्के मतदान महायुतीचे उमेदवार उदय सामंत मिळवतील आणि ते मोठ्या मताधिक्यानी विजयी होतील असा विश्वास ना. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
सहानुभूती वगैरे नाही – तुमच्या विरोधातील पक्षाचे उमेदवार भावनिक राजकारण करत आहेत, त्यांना सहानुभूतीचा लाभ होईल अशी चर्चा सुरु आहे याबाबत आपले मत काय असा. प्रश्न चाय पे चर्चा दरम्यान विचारला असता ना. रविंद्र चव्हाण म्हणाले की, त्यांच्या हातात आता खोटी सहानुभूती मिळवायचे ऐवढेच राहिले आहे. मात्र सहानुभूती आहे असे मला वाटत नाही. लोकसभेला आपण पाहिले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या संपुर्ण, कोकणपट्ट्यात सहानुभूतीचे भावनीक आवाहन करणाऱ्या पक्षाला जनतेने नाकारले. ते जरी भावनीक आवाहन करत असले तरी जनता सुज्ञ आहे, ती अशा आवाहनाला बळी पडणार नाही. हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही कायम राखू असे ना. रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.