पुण्यामध्ये चार दिवसांचे तान्ह बाळ गळा दाबून ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवदुर्ग मित्र ही संस्था आणि एमएमआरसीसीचे कार्यकर्ते सकाळपासून बाळाचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्य स्थितीला केवळ बाळाच्या अंगावरील टॉवेल सापडला असून बाळाचा शोध घेणे सुरू आहे.
घडलेली घटना अशी कि, मंगल सचिन चव्हाण वय २७, रा. गोडांबेवाडी मुळशी, पुणे या इंडिका कारने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबडस गावी निघाल्या होत्या. त्यांची मोठी मुलगी सारीका आणि नुकतेच जन्मलेले चार दिवसांच्या बाळाला घेऊन त्या गावी जात होत्या. पहाटेला ५ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार ताम्हिणी घाट परिसरात आली असता, मंगल हिचा पती सचिन गंगाराम चव्हाण व त्याचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजित गंगाराम चव्हाण हे त्या जागी पोहोचले.
त्यांनी जबरदस्तीने मंगल चव्हाण होत्या ती कार थांबवली आणि मंगलच्या कुशीतील चार दिवसांच्या बाळाला जबरदस्तीने ओढून घेतले आणि त्या तान्हुल्याचा गळा आवळून त्याला खोल दरीत फेकून दिले. त्या चौघांच्या विरोधात मंगल चव्हाण यांनी पौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यासह हवालदार सकपाळ, होळकर व महिला पोलीस शिपाई कोलते हे खाजगी वाहनाने अंबडस गावी पोहोचले, सोबत तक्रारदार महिला व तिची मुलगी सारिका होती.
खेड पोलीस ठाण्यात झाल्या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांनी अंबडस येथून संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजित गंगाराम चव्हाण व सचिन गंगाराम चव्हाण या चौघांना ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्यांच्या उत्तरानंतर बळावलेल्या संशयावरून पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.