यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे पाण्याची टंचाई गेल्या वर्षीपेक्षा अधिक त्रासदायक झाली आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघु अशा एकूण ४९ धरणांमध्ये सध्या २१६.६३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात ४३.६७ टक्के साठा आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात ०.७२८ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी वळवाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत थोडासा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस, कमालीची वाढलेली उष्णता यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे.
परिणामी, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. खेड तालुक्यातील नातुवाडी, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १८२.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. शुक्रवारपर्यंत या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा ५ टक्क्यांनी घट झाली आहे. या तीनही मध्यम धरणांमध्ये मिळून एकूण ११७.९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६४.५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १०८.७१६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४७.१५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.
जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांमध्ये घट झाली आहे. या सर्व धरणांमधील एकूण २३०.५५८ दशलक्ष घनमीटरपैकी आता केवळ १०० दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४७.१५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यंदा ४६ लघु प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्यात सुमारे चार टक्के घट झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची संचय पातळी १२.३०० दशलक्ष घनमीटर इतकी असून, संचय पातळी ३.३४० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यापैकी सध्याची पाणीपातळी १११ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ०.७२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. म्हणजेच या धरणात २१.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.