गेल्या काही महिन्यांपासून रखडेलल्या बहुचर्चित मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. उड्डाणपुलाच्या नव्या डिझाईनला राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी मिळाली असून, त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. नव्या डिझाईन नुसार दोन पिलरच्यामध्ये आणखी एक पिलर उभारण्यात येणार असून त्याच्या खोदाईला सुरुवात झाली आहे. पहिले तयार केलेले गर्डर नष्ट केले जात आहेत. २० मीटरवर एक पिलर उभारल्यानंतर त्यावर गर्डर टाकून कॉक्रिटचा स्लॅब टाकण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नव्याने तयार होणारा उड्डाणपूल ऑक्टेबर २०२३ मध्ये बहादूरशेखनाका येथे कोसळला होता. त्यानंतर पुलाचे काम थांबवले. उड्डाणपुलाच्या पहिल्या डिझाईननुसार ४० मीटरवर पिलर उभारले. त्यासासाठी गर्डरही तयार झाले होते. मात्र, बहादूरशेखनाका येथे वळणावरून हा पूल जात असल्याने डिझाईनमध्ये बदल केला. नव्या डिझाईनला तब्बल सात महिन्यानंतर मंजुरी मिळाली. नव्या डिझाईननुसार दोन पिलरमधील गाळ्याचे अंतर २० मीटर राहणार आहे. प्रत्येक २० मीटरवर एक पिलर उभारण्यात येईल.
यापूर्वी तयार केलेले गर्डर बिनकामाचे झाले असून ते नष्ट केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी नव्याने पिलरची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अतिथी हॉटेलच्या समोर खोदाईला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढ्या खोदाईवर भर दिला जाणार आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले गर्डर पुन्हा नव्याने केले जाणार आहेत.
वाढीव खर्च ठेकेदाराच्या माथी – पहिल्या डिझाईननुसार दोन पिलरमधील अंतर ४० मीटरचे होते. सुशोभीकरणाला देखील उड्डाणपुलाच्या खालील बाजूस वाव होता. मात्र, २० मीटरवर पिलर उभारले जाणार सुशोभीकरणाला वाव असणार नाही. नव्या डिझाईननुसार खर्च वाढणार असला तरी तो संबंधित ठेकेदारास पेलावा लागणार आहे. शासनाकडून उड्डाणपुलासाठी नव्याने वाढीव खर्च केला जाणार नसल्याचेही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.