मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. ही योजना कायमस्वरूपी असणार आहे. त्यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करून सिंहाचा वाटा शासनाने उचलला आहे. या योजनेच्या लाभापासून एकही महिला सुटणार नाही यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. लांजा येथील गणेश मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ आज झाला.
या वेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी वैशाली माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसीलदार प्रमोद कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, ऑगस्ट महिन्यात जरी या योजनेचा अर्ज भरला तरीही जुलैपासूनच त्याचा लाभ मिळणार आहे. दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे.
अंगणवाडी सेविकांनी स्वतःचे घरचे काम समजून या योजनेचे काम सुरू केले आहे. ही योजना चिरकाल टिकणारी असून, भविष्यात कदाचित तिच्या रकमेत वाढच होणार आहे. शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना अशा सर्व योजनांचा लाभार्थीनी लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले. योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पिवळे आणि केशरी शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. शेवटी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी आभार मानले.