येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्षनिहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीतील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-अ ते क मधील नियमित ५०९ पदे वर्षनिहाय टप्प्याटप्याने निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेकडून घेण्यात येतील.
प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार आहेत. प्रथम वर्षाची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्षी निर्माण केली जातील. त्या पदांसाठीच्या वेतनाकरिता लेखाशीर्षही मंजूर केला गेल्यामुळे आवश्यक ती आर्थिक तरतूद केली गेली आहे. पुढील टप्प्यांच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षीच्या अंदाजपत्रकात केली जाईल. बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या २७ एप्रिल २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे त्या शासननिर्णयात नमूद केले आहे.