रेशन दुकानदारांना जुन्या २-जी ई-पॉस मशीनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशीन उपलब्ध करून दिली आहेत. पुरवठा विभागाकडून तालुक्यातील रेशन दुकानदारांना नुकतेच या नव्या मशीनचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबवण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे.
लाभार्थ्यांची ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन अमलातही आणला गेला. त्यानुसार गेली पाच वर्षे संगणकीय वितरण प्रणालीद्वारे ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. रेशनवरील धान्य वितरणात ई-पॉस मशीन महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशीनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे थम्ब घ्यावे लागतात. तांत्रिक अडचणीमुळे लवकर थम्ब इम्प्रेशन होत नसल्याने एका शिधापत्रिकाधारकाला त्यासाठी सुमारे १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा लागतो. जुन्या टूजी ई-पॉस मशीनमधील या त्रुटींमुळे धान्यवितरण प्रणाली विस्कळीत झाली होती. तसेच अनेक ई-पॉस मशीनमधील सीमकार्ड निरुपयोगी झाल्यामुळे रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करत होते.
गर्दीवेळी मशीन मधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना लोकांच्या रोषाला सामोरे जाव लागत होते. या साऱ्याची दखल घेऊन शासनातर्फे ४जी प्रकारातील ई-पॉस मशीन पुरवठा विभागाला उपलब्ध झाली आहेत. या मशीनमध्ये दोन सीमकार्ड बसणार असून, मशीनलाच चार्जिंगची सुविधा आहे. त्यांच्या जोडीला वायफायची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या मशीनपेक्षा नवीन मशीन आकाराने मोठे आहे. अत्याधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांना धान्य घेण्यासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक ई-पॉस मशीनचे तालुक्यातील दुकानदारांना नुकतेच वाटप करण्यात आले.