रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला आहे. स्टरलाईटपैकी पाच एकर जागा घनकचरा प्रकल्पाला दिला जाणार आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींनाही या प्रकल्पात आणले जाणार आहे. सुमारे साडेआठ कोटींचा हा प्रकल्प असून, आता शहर आणि परिसरातील ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, रत्नागिरीच्या घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने साडेआठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी दांडेआडोम येथील जागा निश्चित केली होती; परंतु वाहतुकीच्यादृष्टीने न परवडणारा हा प्रकल्प होता.
आता एमआयडीसीच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. स्टरलाईटची जागा एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे, त्यापैकी दरीसारख्या भागांत असणारी पाच एकर जागा निश्चित केली आहे. या ठिकाणी हा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पामध्ये शहरालगतच्या नाचणे, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव या ग्रामपंचायतींचा घनकचराही या प्रकल्पात घेतला जाणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. आजूबाजूची गावे वाढत्या शहरीकरणाचा भाग आहेत. या ठिकाणी सरकारी कर्मचारीही मोठ्या प्रमाणात राहतात.
त्यामुळे सर्वांनाच सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कुवारबाव येथील काही ग्रामस्थांनी घनकचरा प्रकल्पासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे; परंतु त्यांना विनंती आहे की, आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी चर्चा करावी. त्यांचा प्रश्न या प्रकल्पातून सुटणार आहे, असे सामंत म्हणाले.