उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईला आळा बसावा, जनावरांसह पशुपक्ष्यांना पाणी मिळावे, विहिरीतील पाणीपातळी वाढावी यासाठी तालुक्यात एकाच दिवशी मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकाच दिवसात तालुक्यात ५५० बंधारे ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आले. १३० ग्रामपंचायतींत राबवलेल्या या मोहिमेत ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय विद्यार्थी, युवक, ग्रामस्थ व महिला सहभागी झाले होते. आतापर्यंत तालुक्यात ८०० बंधारे झाले असून, एक हजार बंधारे उभारणार असल्याचे गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी सांगितले. तालुक्यात लोकसहभाग व श्रमदानातून विजय बंधारे १५०, वनराई ५०, कच्चे बंधारे ३५० असे ५५० बंधारे एकाच दिवसात बांधण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान ६.० हे अभियान तालुक्यात राबवण्यासाठी मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतनिहाय बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले. तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटनिहाय अधिकाऱ्यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली. पंचायत समितीमधील खातेप्रमुखांवर त्याची जबाबदारी सोपवली. प्रत्येक गावात किमान १० बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले. १८ डिसेंबरला तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीत एकाच दिवशी मोहीम राबवण्यात आली. बंधाऱ्यात साठलेले पाणी पाहून सर्व पथकप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाल्याने नदी, नाले, शेजारील विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
बचतगट, तरुण मंडळांचा सहभाग – बंधारे बांधण्यासाठी बचतगटाच्या महिला, तरुण मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, गावातील शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्या माध्यमातून हे बंधारे बांधले.

