तालुक्यातील मालगुंड येथे सुमारे १७ हेक्टर जागेमध्ये प्राणी संग्रहालय होणार असून, कंपाउंडचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एमआयडीसीकडून कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिली जाणारी ६०.७५ कोटी रक्कम जिल्हा परिषदेला टप्प्याटप्प्याने फेडावी लागणार आहे. आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, जंगली मांजर, लेपर्ड कट, पिसोरी हरीण, तरस आदी प्राण्यांचा समावेश आहे. प्रत्येक प्राण्यांसाठी सुरक्षित स्वतंत्र पिंजरा असणार आहे. पर्यावरण व वनविभागाच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून प्राण्यांची देखभाल केली जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
मालगुंड येथे सुमारे १०० कोटींचे हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. कंपाउंड वॉलसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषद, वनविभाग व उद्योग विभागाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सामंजस्य करारानुसार हे प्राणी संग्रहालय होणार आहे. यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कर्जस्वरूपात देणार आहे. ६०.७५ कोटींचे कर्ज रत्नागिरी जिल्हा परिषदेला टप्प्याटप्प्याने फेडावे लागणार आहे. कर्जाऊ रकमेसह प्राण्याच्या देखभालीचा खर्च निघावा या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
प्राणी संग्रहालय पूर्णत्वानंतर देखभाल दुरुस्तीकरिता कोणताही वित्त पुरवठा अथवा कोणतेही प्रकारचे साहाय्य महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरवण्यात येणार नाही. कामांवरती देखरेख, तांत्रिक नियंत्रण, गुणवत्ता व इतर अनुषंगिक बाबींची जबाबदारी जिल्हा परिषद यांची राहील तसेच मागणीप्रमाणे केवळ निधी वितरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची राहील. प्राणी संग्रहालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने महामंडळास परत करण्याची योजना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा परिषद यांनी तयार करून शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे, असे अध्यादेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.
वन्यप्राण्यांचा समावेश – आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, जंगली मांजर, लेपर्ड कट, पिसोरी हरीण, तरस आदी प्राण्यांचा प्राणीसंग्रहालयात समावेश आहे. प्रत्येक प्राण्यांसाठी सुरक्षित स्वतंत्र पिंजरा असणार आहे. पर्यावरण व वनविभागाच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून प्राण्यांची देखभाल केली जाणार आहे.