क्रीडाक्षेत्रात भूषणावह कामगिरी करणारे खेळाडू राज्य व देशाची शानच असतात. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी करणाच्या खेळाडूंच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. किताब प्राप्त कुस्तीगिरांप्रमाणेच तिपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना आता दरमहा साडेसात हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे १२ वर्षांनंतर ही वाढ केली आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या राज्यातील खेळाडूंना सन्मानपूर्वक मानधन देण्याची योजना १० जून १९९३ पासून सुरू झाली. त्यानंतर म्हणजे ५ फेब्रुवारी १९९८ ला मानधनात वाढ करण्यात आली.
ही वाढ २०१० आणि २१ डिसेंबर २०१२ लाही सुरूच होती. २०१२ नंतर मात्र खेळाडूंच्या मानधनात वाढच झाली नाही. ही वाढ तब्बल १२ वर्षे रखडली. एक तपानंतर सरकारने राज्यातील खेळाडूंना न्याय देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना २ हजार ५०० रु. मानधन मिळत होते ते आता प्रतिमहिना ७ हजार ५०० रुपये इतके मिळणार आहे. आशियाई खेळाडूंना चार हजार मानधन मिळत होते ते आता १० हजार मिळणार आहे.