गेली वर्षभर राजन साळवी यांच्याविरोधात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चौकशीचा ससेमिरा मागे होता. तब्बल सहावेळा त्यांची आणि कुटुंबीयांची चौकशी झाली. त्यांच्या आणि आईच्या आजारपणाची माहिती देखील त्यांनी मागवल्याने साळवी संतप्त झाले आणि पुन्हा एसीबीच्या चौकशीला सामोरे जाणार नाही, असा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी अचानक पावणेआठ वाजता ठाणे, रायगड, रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १७ अधिकाऱ्यांमार्फत साळवी यांच्या रत्नागिरीतील पाच मालमत्तांवर छापे टाकून चौकशी सुरू केली. याची बातमी सर्वत्र पसरताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते साळवी यांच्या झाडगाव येथील बंगल्यावर धडकले. मोठ्या प्रमाणावर तेथे गर्दी केली. साळवीसाहेब तुम्ही घाबरू नका, शिवसैनिक तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, असा आधार शिवसैनिकांनी दिला.
राजन साळवी यांची शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीतील ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात आल्या. त्यांच्या ताब्यात उत्पन्नापेक्षा जास्त ३ कोटी ५३ लाख ८९ हजार ७५२ इतकी संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले. अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम साळवी यांनीही अपसंपदा आहे, हे माहीत असूनही त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या नावे मालमत्ता धारण करून कब्जात बाळगल्याबद्दल साळवी यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले म्हणून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत. त्या अनुषंगाने आमदार राजन साळवी यांचे घर, हॉटेल, कार्यालय व इतर सात संबंधित ठिकाणी एकाचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत घरझडती सुरू करण्यात आली आहे.
येथे पडले छापे – साहेब या बंगल्याची, तेली आळीतील जुन्या घराची, दुर्गेश बारची, ऑफिसची आणि भावाच्या मालमत्तेची एसीबीने धाडी टाकून चौकशी केली. आठ तास होऊन गेले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरूच होती.
लॉकरची तपासणी – सायंकाळी सव्वापाच वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात राजन साळवी यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर तपासण्यासाठी नेले. या वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला; परंतु पोलिसांनी समजावून सांगत त्यांना बँकेत नेण्यात आले.
मी अटकेला घाबरत नाही – माझ्यावर गुन्हा दाखल केला तरी चालेल; पण माझ्या पत्नीवर आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे, याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतीलच, असे आव्हान आमदार राजन साळवी यांनी दिले. ते म्हणाले, “हे जे त्यांनी पैसे सांगितले ते कुठले ते माहिती नाही. आमच्यावर असलेले कर्जही त्यांनी दाखवावे. मला उद्धव ठाकरे यांनी फोन करून धीर दिला. संपूर्ण राज्याची शिवसेना माझ्या पाठीशी आहे. जे अधिकारी रत्नागिरी शहरात छापा टाकणार होते, त्याची पूर्ण माहिती मला होती. शहरातील एका हॉटेलमध्ये अधिकारी उतरले होते. तिथल्या नागरिकांकडून मला सविस्तर माहिती दिली जात होती. मी अटकेला घाबरत नाही. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला जाणीपूर्वक त्रास देणे सुरू आहे.”