पावसापुर्वीच्या तयारीमध्ये रत्नागिरी पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात एकूण ७१ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. या इमारतींना परिषदेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. निवासी इमारतीमध्ये नागरिक राहत नसल्याने इमारती रिकाम्या आहेत. मात्र, शहरातील नवीन भाजीमार्केटची इमारत धोकादायक बनली आहे. मात्र, इमारतीतील व्यावसायिक जीव धोक्यात घालून व्यवसाय करीत आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी पालिकेने सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ७१ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेने त्यांना तत्काळ नोटिसा बजावून त्या रिकाम्या करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. धोकादायक इमारतीमध्ये कोणीच राहत नाहीत. त्यामुळे इमारती रिकाम्या आहेत. नवीन भाजीमार्केटची इमारत धोकादायक बनली असल्याने पालिकेने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. पर्यायी जागा व अन्य मागण्यांसाठी गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. इमारतीच्या ३० गाळ्यांत ४० वर्षांपासून व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. इमारतीचा वरचा मजला रिकामा आहे. खालच्या भागात जीव धोक्यात टाकून व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. मालक, कामगार धोकादायक स्थितीत काम करत आहेत.