दापोली तालुक्यात २०३ मिलिमिटर इतका विक्रमी पाऊस गेल्या चोवीस तासात नोंदल्यामुळे दाणादाण उडाली. शहरात भारतनगर, काळकाईकोंड, नशमेन नगर परिसरात पाणी भरले होते. आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. गुहागर तालुक्यात घरांसह व दुकानांमध्ये पाणी शिरले, तर पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जगबुडी, वाशिष्ठी, गडनदीसह अर्जुना आणि कोदवली या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. रविवारी (ता. ७) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. पावसामुळे दापोली शहरातील सखल भागातील घरात पाणी शिरले होते.
शहराच्या केळस्कर नाका परिसरात दोन फूट पाणी होते. टाळसुरे येथील मेडिकल कॉलेज बसस्टॉपच्या पाठीमागे राहणाऱ्या करमरकर यांच्या घराजवळ पाणी भरल्यामुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामध्ये मयुरेश देविदास करमरकर (वय ३७), देविदास गणपत करमरकर (७४), प्रमिला देविदास करमरकर (६०), अजित नारायण जोशी (७२), अश्विनी अनुप जोशी (३५), अनय अनुप जोशी (वय ६) यांचा समावेश आहे. दापोली शहरातील शिवाजी नगर, नांगर बुडी, भारत नगर, समर्थ नगर जालगाव, उन्हवरे, फरारे परिसरातील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले. डोंगरावरून वाहणारे पाणी व माती ताडील-कोंगले रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक बंद झाली.
कोळबांद्रे, ताडील, कोंगले, नवशी, आसूद येथील रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद केली होती. पाळंदे येथील बर्फ व्यावसायिक राजेश तवसाळकर यांनी हर्णे बंदर बंद असल्याने सर्व साहित्य किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. बर्फ वाहतुकीचा ट्रकही फॅक्टरीमध्ये सुरक्षित होता; मात्र फॅक्टरीच्या परिसरात पाणी साचल्यामुळे ट्रकही पाण्याखाली गेला. खेड-वाकवली रस्त्यावर परिसरात दोन फूट पाणी आल्यामुळे दापोली-पुणे एस.टी. रद्द केली. सोमवारी ताडील, कोंगले मार्गावर दरड कोसळल्यामुळे एसटी सेवा बंद होती. बांधतिवरे मार्गावर नदीला आलेल्या पुरामध्ये चारचाकी गाडी उलटली. गाडीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
बांधतिवरे भागातील भातपिकाचे नुकसान झाले असून शेती वाहून गेली आहे. दापोली- हर्णे मार्गावर झाडे पडल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. पावसामुळे १५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून करंजाणी, आघारी, आवाशी, उन्हवरे आदी गावांतील घरांची मोठी पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचानामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जगबुडीला पूर आलेला असून पाणी खेड शहरात शिरण्याची भीती कायम आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. राजापुरातील अर्जुना नदीचा पूर आज ओसरला असला तरीही बंदर धक्का परिसरात पाणी कायम असल्यामुळे पुराचे पाणी शहरात येऊ शकते.
संगमेश्वरमधील गडनदी, लांजा-रत्नागिरीतील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहत असल्यामुळे किनारी भागात पुराचे संकट कायम आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील पुराचे पाणी ओसरले. बाजारपेठेसह हातीस येथील दर्यात पुराचे पाणी शिरले होते. गुहागर तालुक्याला पावसाने झोडपले असून शृंगारतळीसह परिसरातील अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. बाजारपेठेमध्ये एक फुटापर्यंत पाणी होते. महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती. लांजा भांबेड येथील भाई जोशी यांच्या घर परिसरात दिवसभर पाणी साचले होते. भांबेड बाजारपेठ येथील शंकर गांधी यांच्या दुकानात गटाराचे पाणी व चिखल जाऊन नुकसान झाले.
मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे महामार्गाची साईडपट्टी खचली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ९२ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड ७६.५०, दापोली ६५, खेड ३९.२८, गुहागर ११०.८०, चिपळूण ८८.३३, संगमेश्वर १३६.३३, रत्नागिरी ११४.७७, लांजा १०२.२०, राजापूर ९१.७५ मिमी. अशी नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ११५७ मिमी. नोंद झाली आहे.
लोंढ्यात वाहिल्याने नौकेचे नुकसान – मच्छीमारांनी नौका आंजर्ले खाडीत काळकाईच्या ठिकाणी ठेवल्या आहेत. अतिवृष्टी आणि उधाणामुळे आंजर्ले खाडीतील पाण्याच्या लोंढ्यात वाहून आल्याने प्रमोद जनार्दन दोरकुळकर यांच्या नौकेचे नुकसान झाले आहे. शहराजवळील जालगाव येथे नवीन वसाहतीला पाण्याचा वेढा पडला होता. तिथे रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. तसेच नागरिकांना हलवण्याची तयारीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.