भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वविजेता झाल्यानंतर खेळलेल्या पहिल्याच लढतीत पराभूत झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या नवोदित टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. दुबळ्या झिम्बाब्वे संघाने १३ धावांनी सनसनाटी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेकडून भारतीय संघासमोर ११६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले; पण आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील युवा खेळाडूंना आपला ठसा उमटवता आला नाही. काही फलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाजी करीत आहेत, अशाच आर्विभावात खेळत होते.
पहिलेच षटक टाकत असलेल्या ब्रायन बेनेटच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात शून्यावरच वेलिंग्टन मासाकादझाकरवी झेलबाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (सात धावा), रियान पराग (दोन धावा) व रिंकू सिंग (०) हे झटपट बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था चार बाद २२ धावा अशी बिकट झाली. कर्णधार शुभमन गिल व ध्रुव जुरेल या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण ल्यूक जाँगवी याने जुरेलला (सहा धावा), तर सिकंदर रझा याने गिलला (३१ धावा) बाद करीत मोठा अडसर दूर केला. यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने २७ धावांची खेळी करीत विजयासाठी प्रयत्न केले; पण भारतीय संघाचा डाव १०२ धावांवरच संपुष्टात आला.
तेंदाई चतारा व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले. त्याआधी वेस्ली मदेवेरे (२१ धावा), ब्रायन बेनेट (२२ धावा), डियॉन मेयर्स (२३ धावा), क्लाईव्ह मडांडे (नाबाद २९ धावा) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्यामुळे झिम्बाब्वेला ११५ धावांपर्यंत मजल मारता आली. रवी बिश्नोई याने १३ धावा देत चार फलंदाज बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने ११ धावा देत दोन फलंदाज बाद केले.