सावर्डे- डेरवण मार्गावरील मातोश्री इमारतीत असलेल्या ज्वेलर्स दुकानाच्या काउंटर टेबलावरील शोकेसमध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह दागिने असा नऊ लाख १४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल (ता. १८) उघडकीस आली. चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेरवण ते सावर्डे मार्गावरील गंगाराम सदाशिव जोशी यांच्या मालकीच्या मातोश्री या इमारतीत तळमजल्यावरील गाळा क्रमांक चारमध्ये शिरोडकर स्टोअर्स आहे. १७ व १८ मे या कालावधीत या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने तोडून नुकसान केले. त्यानंतर त्या दुकानालगत असलेल्या गाळा तीनमधील अलंकार ज्वेलर्स या दुकानाला लक्ष्य केले. या दुकानासमोरील लोखंडी शटरला लावलेल्या दोन्ही कुलपाच्या लोखंडी पट्ट्या कोणत्यातरी हत्याराने कापून चोरट्याने शटर उघडले. नंतर ज्वेलर्स दुकानात प्रवेश करून त्याने दुकानातील काउंटर टेबलावरील शोकेसमध्ये ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने व रोख रक्कम असा नऊ लाख १४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.दरम्यान, ही चोरी करतेवेळी तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरची वायर तोडून नुकसान करून डीव्हीआर चोरून नेला. हा प्रकार ज्वेलर्स मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.