खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड किल्ला ही दोन पावसाळी पर्यटन स्थळे पुढील २ महिन्या साठी बंद करण्यात आली आहेत. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी मात्र या स्थळी योग्य ती खबरदारी घेऊन सर्व सामान्य पर्यटकांना खुली करावी अशी मागणी येथील उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे.
प्रत्येक वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून या दोन पर्यटन स्थळवर हजारो पर्यटक पर्यटनासाठी भेट देत असतात. दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे आपल्या आदेशाने या दोन्ही पर्यटन स्थळांना भेट देण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन वाढीसाठी शासन करोडो रुपये या दोन्ही पर्यटन स्थळांसाठी खर्च करत आहे. परंतु जर पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळत नसेल तर या पर्यटन स्थळांचा आणि त्यावर केलेल्या खर्चाचा काय उपयोग? आपल्या आदेशाने वरील दोन्ही पर्यटन स्थळांना पर्यटकांना येण्यास बंदी घातल्याने खेड तालुक्यात येणारे पर्यटक दुसऱ्या पर्यटन स्थळांकडे वळत आहेत.
यामुळे खेड तालुक्यातील पर्यटनावर आधारित असलेल्या व्यावसायिक नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. पर्यटन स्थळ रसाळगड किल्ला येथे सध्या तरी कोणताही धोका नाही पर्यटन क्षेत्र रसाळगड किल्ला येथे जाणारा रस्ता नवीन केल्यामुळे मागील वर्षी किरकोळ दरडी कोसळल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत रस्ता सुस्थितीत असून शासनाची एस.टी. बस सेवा नियमित सुरु आहे. यामुळे पर्यटन स्थळ रसाळगड किल्ला येथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालणे हा पर्यटकांवर अन्याय केल्यासारखे आहे.
पर्यटन स्थळ रघुवीर घाट व रसाळगड किल्ला येथे दरडी पडण्याची शक्यता आहे तेथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करून दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुली करावीत अशी स्थानिक जनतेची व पर्यटकांची मागणी आहे. पावसाळी हंगामात रघुवीर घाट व रसाळगड किल्ला येथे येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आखाडे यांनी निवेदनात नमूद केली आहे.