सरकारने होमआयसोलेशन बंद केल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक व्यक्ती लहान मोठ्या स्वरूपामध्ये मदत करायला पुढे सरसावत आहे. शासनाने २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये १० बेड्सचे संस्थात्मक विलगीकरण कोविड सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातून तपासणी आठवा उपचारासाठी एवढ अंतर पार करून रत्नागिरी शहरामध्ये येणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे जवळील असलेल्या आरोग्य केंद्राला स्थानिक नागरिक वैद्यकीय सुविधांचा पुरवठा करताना दिसत आहेत.
राजापूर येथील धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरला स्थानिक आडिवरे येथील आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सर्वांनी मिळून, ३४,५०० रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कोविड सेंटर साठी केलेली आर्थिक मदत ही माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांच्या मार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखील परांजपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
शासनाने कोरोना आजारावर तपासणी आणि उपचार करण्यासाठी रायपाटण येथे कोविड सेंटर उभारले आहे. परंतु पंचक्रोशीतील सगळ्याच जनतेला तिथे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. एकतर कोविड रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक असते, आणि ते जर नाही मिळाले वेळेवर तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे गावाच्या जवळपास कुठेतरी कोविड उपचार केंद्र असावे असे म्हणून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भाग असल्याने अनेक सोई सुविधांचा अभाव जाणवतो त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून दानशूर व्यक्तींनी अशा कोविड उपचार केंद्राला मदत करावी, जेणेकरून रुग्णांना आणि त्य्नाच्या नातेवाइकांना उपचारांकरिता, औषधांकरिता इतरत्र वणवण करावी लागू नये, असे आवाहन नागले यांनी केले आहे.