दि. ६ जून रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. त्यानिमित्त प्रत्येक शाळा, कॉलेज, खाजगी युनिवर्सिटी आणि विद्यापीठामध्ये हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यासोबतच रत्नागिरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्यांची आंतरराष्ट्रीय लायब्ररी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक विशेष समितीची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे, शिवचरित्राचा अभ्यास केलेल्या ५ तज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.
रत्नागिरी मध्ये तीन शैक्षणिक नवीन प्रकल्प सुरु होणार असल्याच्या वृत्तावर नाम. सामंत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामध्ये YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी मध्ये सुरु करण्यात येणार आहे. रामटेक येथील कवी कालिदास विद्यापीठाचे उपकेंद्र सुद्धा रत्नागिरी मध्ये सुरु करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जगभर डंका आहे त्यांच्या कार्याची इत्यंभूत माहिती आजच्या पिढीला होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या साहित्याची माहिती असणारी आंतरराष्ट्रीय लायब्ररी रत्नागिरी सुरु होणार आहे. जेणेकरून शिवाजी राजेंबद्दल हवी असलेली कोणत्याही माहितीचे पुस्तक इथे उपलब्ध असेल. या तिन्ही करारावर आज स्वाक्षरी झाल्याची माहिती नाम. सामंत यांनी दिली.
येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकल्पांचे भूमिपूजन प्रक्रिया होणार असून, या प्रकल्पांसाठी जागाही निश्चित केल्या गेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र बी.एड कॉलेजमध्ये सुरु करण्यात येणार आहे, तर कवी कालिदास विद्यापीठाचे उपकेंद्र महिला विद्यालयाच्या परिसरामध्ये सुरु करण्यात येणार आहे. संबंधित उपक्रमांच्या निधीला सुद्धा मंजुरी मिळाल्याने रत्नागिरीमध्ये शिक्षण पद्धती आत्ता अजून हायटेक होणार आहे.