हर घर तिंरगा उपक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत. वक्तृत्व, निबंध, रांगोळी आदी विविध जनजागृतीपर स्पर्धा घेतल्या जात आहेत. तिरंग्याविषयी देशप्रेम जागृत केले जात आहे. या निमित्ताने तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे आदींनी खेर्डीतील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा नं. १ ला सदिच्छा भेट दिली. ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून साकारत आहे.
सुरवातीस हर घर तिरंगाबाबत शाळेतील माहिती, पाहणी करण्याचे नियोजन होते; मात्र आयत्यावेळी झाले वेगळेच. तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी चाललेला संवाद चांगलाच बहरत गेला. विद्यार्थ्यांनो, तुमचे नेमके ध्येय काय? यावर बहुतांशी विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेतून क्लास वन अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक आदी बनण्याचा इच्छा व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनीही तितक्याच आत्मविश्वासाने उत्तरे दिली. या निमित्ताने शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेची पाहणी केली. मॉडेल स्कूलची अध्ययन पद्धत व अभ्यासक्रम बदलला आहे, त्याचीही माहिती घेतली.
शहरालगतच्या खेर्डी येथे मॉडेल स्कूल म्हणून साकारत असलेल्या जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा नं. १ येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेची उलटतपासणी केली. त्यावेळी देखील विद्यार्थ्यांनी हरजबाबीपणे दिलखुलास अचूक उत्तरे देऊन अधिकार्यांना अचंबित केले. अनेक विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून मोठे ध्येय गाठण्याचा संकल्पही व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता पाहून अधिकारीही भारावून गेले.
या वेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी आपला अनुभव विद्यार्थ्यांना सांगताना म्हणाले, आम्ही देखील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकलो. येथेही चांगले शिक्षण मिळते. इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून येथे विद्यार्थी येतात, ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. तहसीलदारांनी अचानकपणे दुसरीच्या विद्यार्थ्यास २७ आणि २९ चा पाढा विचारला असता त्या विद्यार्थ्याने तो न चुकता म्हटला. त्यावर अधिकारीही चकित होऊन या विद्यार्थ्याचे तहसीलदारांनी उपयुक्त बक्षीस देऊन कौतूक केले.