शिवसेनेत राजकीय भूकंप झाल्यानतंर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आणि या सर्व घडामोडी घडत गेल्या. अल्पावधीतच त्यांना उपनेते आणि नंतर प्रवक्तेपद देण्यात आले. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाची ही सर्वात महत्त्वाची समिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याची या समितीवर निवड केली जाते. उदय सामंत यांच्या हस्तेच शासकीय ध्वजवंदन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेले उदय सामंत यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान आणखी मजबूत झाले आहे. सामंत यांची प्रतिष्ठेच्या विधिमंडळ कामगार सल्लागार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवड केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारमधील एक महत्त्वाचा मंत्री म्हणून उदय सामंत यांना महाराष्ट्र ओळखू लागला आहे.
विरोधकांच्या दबावानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला पण अद्याप खाते वाटप जाहीर झालेलं नाही. पण येत्या स्वांतत्र्यदिनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारी ध्वजारोहण कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरुन आता ही यादी म्हणजेच पालकमंत्रीपदांची यादी असल्याची चर्चा सुरु आहे.
१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी १९ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात, सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात, चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करतील. त्यामुळं जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.