मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रथमच मंत्री उदय सामंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना उद्योगखाते दिल्याचे जाहीर झाले. जिल्ह्यात त्यांचे जोरदार स्वागत झाले. खेडपासून चिपळूण, संगमेश्वर आदी भागांमध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात आणि मोठ्या उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर सामंत रात्री उशिरा रत्नागिरीत दाखल झाले. सोबत श्रीमंत संभाजीराजे होते. शहरातील मारूती मंदिर सर्कल येथील शिवसृष्टी आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिचिन्हाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला.
तेंव्हा बोलताना ते म्हणाले, उद्योगमंत्रीपद कोकणाला दिले आहे. त्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आमची जबाबदारी आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. कोकणात रिफायनरीच नव्हे, तर प्रत्येक प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त कोणते प्रकल्प कोकणात आणणे शक्य आहे, त्याचा अभ्यास करून लवकरच त्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते आधी दूर केले जातील. त्यासाठी लवकरच माझ्या दालनात बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी आहे. आज जो काही महाराष्ट्र पाचव्या-सहाव्या क्रमांकावर आहे, त्याला परत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. बेरोजगारी दूर करणे काळाची गरज बनलेली आहे. कोकणात आलेल्या प्रकल्पाचे समर्थन केले पाहिजे. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला उद्योगखाते मिळाले. भविष्यात कोकणातील एकही तरुण किंवा तरुणी बेरोजगार राहणार नाही.