महावितरणाच्या ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांमुळे होणारा नाहक मन:स्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबवलेल्या विशेष प्रयत्नांमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अचूक मीटर रिडिंग न घेणाऱ्या एजन्सीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर चांगला परिणाम पुढे आला आहे. मागील ३ महिन्यात एप्रिल ते जून २०२२ वीज विक्रीतही तब्बल ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रीडिंग घेताना असणाऱ्या अस्पष्ट छायाचित्रांचे प्रमाण ४५ टक्के होते. या कारवाईमुळे हे प्रमाण आता अवघ्या ३ टक्क्यावर आले आहे. कोकण परिमंडळात हा सकारात्मक परिमाण झाला आहे. ग्राहकांना त्याचा फायदा होत असून अचूक बिल येत असल्याने तक्रारीचे प्रमाण कमी झाल्या आहेत.
उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यांना महावितरणाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतू पुरस्कर नादुरुस्तीचा शेरा देणे, याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करत राज्यातील तब्बल ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले.
तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्याना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महावितरणने मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सीजच्या कामांचे मुल्यांकन करत त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे.