गणपती उत्सवाला चार दिवसच शिल्लक राहिल्याने, आणि विकेंडपासून चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना सोईसुविधा पुरवण्यासाठी विविध विभाग जोमाने कामाला लागले आहेत. महामार्गावर २१ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मार्ग हा डोंगरदर्यातून जातो. पावसाळी दिवस असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे अपघातावेळी त्वरित मदत मिळावी यासाठी महामार्गावर चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्या जातील.
गणेशोत्सव कालावधीत लाखो चाकरमानी गावाकडे येतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर विविध ठिकाणी वाहतूककोंडी होते. वाहनचालकांच्या मदतीसाठी महामार्गावर २१ ठिकाणी पेंडॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही व्यवस्था केली जाणार आहे.
गणेशोत्सव ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. यासाठी मुंबईसह इतर ठिकाणी नोकरीनिमित्त असलेले लोक खासगी वाहनांनी, एसटी बसने गावाकडे येतात. त्यात हॉटेल अनुसया, हॅप्पी ढाबा, भरणेनाका, भोस्ते घाट (खेड), सवतसडा, कळंबस्ते, बहादूरशेख नाका, खेर्डीनाका, कापसाळ, दहिवली फाटा (ता. चिपळूण), आरवली, तुरळ, गोवळली, कुंड, देवरुख फाटा (संगमेश्वर) असे एकूण २१ ठिकाणी चाकरमान्यांसाठी मदतकेंद्र ठेवण्यात आली आहे.