भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूबाबत कुटुंबाने शंका व्यक्त केलेली खरी ठरली असून, त्यांची हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. सोनाली यांच्या भावाने दावा केला, की त्यांच्या बहिणीने मृत्यू आधी कुटुंबियांना फोन केला होता. या कॉलवर त्यांनी सुखविंदर यांच्यावर संशय व्यक्त केला होता. सुखविंदर आणि सुधीर कोणत्याही थराला जाऊ शकतात असं त्यांनी कुटुंबियांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर फोन कट झाला होता. हा मृत्यू म्हणजे कट-कारस्थान करुन करण्यात आलेली हत्या असल्याचं सोनाली यांच्या भावाने म्हटलं आहे.
सोनाली फोगट २२ ऑगस्टला सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंग या सहकाऱ्यांसोबत गोव्याला आल्या होत्या. ‘दोन्ही आरोपी अंजुना येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीत सोनाली यांना दिलेल्या पेयामध्ये काही रासायनिक पदार्थ मिसळताना दिसून आले. हे पेय सोनाली यांना दोनदा पाजण्यात आले. त्यांच्या पेयामध्ये जाणीवपूर्वक अमली पदार्थ मिसळल्याचे दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत कबूल केले आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिश्णोई यांनी दिली आहे.
फोगाट यांच्या पेयामध्ये त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी पार्टी दरम्यान अमली पदार्थ मिसळले होते. अमली पदार्थामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक दावा गोवा पोलिसांनी केला होता. तसंच, सोनाली यांची तब्येत बिघडल्यानंतर आरोपींनी त्यांना वॉशरुममध्ये नेले. दोन तास ते सोनालीसोबत बाथरुममध्येच होते, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्या दोन तासांत काय घडले हे कोठडीतील चौकशीनंतरच समजेल,’ असे पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिष्णोई यांनी सांगितले.
त्या संदर्भात बिष्णोई म्हणाले,‘चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, सोनाली यांना रुग्णालयात नेत असताना खरचटल्यामुळे ते झाले असावे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. सोनाली यांच्या शरीरावर अवजड वस्तूने मारहाण केल्याच्या खुणा आढळल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.