जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकाच दुसऱ्या अपघातग्रस्त रुग्णवाहिकेच्या मदतीला धाऊन गेली. त्यातील यकृत आणि जखमींना घेऊन ती पुण्याला तातडीने धावली. घटनेमध्ये घडले अशा प्रकारे कि, कोल्हापूरकडून पुण्याला रुबी हॉस्पिटलची रुग्णवाहिका यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन चालली होती. त्यांच्यासमवेत दोन डॉक्टर, पोलिस पायलटसह ग्रीन कोरिडॉरमधून पुण्याला चालली होती. त्यावेळी पुणे – बंगळूर महामार्गावर किकवी येथे त्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. यावेळी वेळेचे गांभीर्य लक्षात घेता किकवीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकाऱ्यांनी महामार्गावर किकवी येथे कार्यरत असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेकडे मदत मागितली.
संस्थांनाच्या रुग्णवाहिकेचे चालक तुळशीराम रघुनाथ अहिरे त्यासाठी तातडीने तयार झाले. सारे अपघातस्थळी गेले. कारण यकृत तातडीने पुण्याला नेणे आवश्यक होते. मग ते यकृत आणि इतर जखमी लोकांना घेऊन संस्थानची रुग्णवाहिका तत्परतेने, वेळेत सर्वांना रुबी हॉस्पिटल पुणे येथे सोडून आली. त्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया झाली. रुग्णवाहिकेचे चालक तुळशीराम अहिरे यांना धन्यवाद दिले.
अहिरे यांच्या या कामाचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी कौतुक केले. त्याशिवाय राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, किकवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनीही अहिरे यांचे अभिनंदन केले. सध्या वेगळ्या महामार्गावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या ३६ मोफत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. वेळे गरजेला कायमच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका उपयोगी पडत असतात, त्यातच चालकाने दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे शस्त्रक्रिया वेळेत पार पडली.